इंदिरानगरमध्ये बिबट्याचा वावर

ठाणे: ठाण्यातील इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी वनविभागाला केली आहे. तसे निवेदन त्यांनी येऊर येथील वनक्षेत्रपाल यांना दिले आहे.

ठाणे महानगरपालिका प्र.क्र. १५ इंदिरानगर कब्रस्तान, हनुमान नगर परिसरामध्ये तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला आहे. येथे दाट लोकवस्ती असल्याने लहान मुले, नागरीकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. हा परिसर झोपडपट्टीचा असल्याने बऱ्याच नागरीकांच्या घरात शौचालय नसल्याने नागरीक रात्री उघड्यावर लघुशंकेस जात असतात. या बिबट्याने परिसरातील एका कुत्र्यालाही उचलुन नेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे.

ही बाब फार गंभीर असून बिबट्याने परिसरातील कोणत्याही नागरीकावर हल्ला केल्यास नागरीकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या घटनेकडे वनविभागाने गांर्भीयाने पाहून बिबट्याला ताब्यात घेण्याकरीता तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी केली आहे.