नातेवाईकांनी नाकारल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनीच केले अंत्यसंस्कार
ठाणे: पाच-दहा नव्हे, तब्बल ६० वर्षे ठाणे मनोरुग्णालयाने सेवा सुश्रुषा आणि सांभाळ केलेल्या एका ९६ वर्षीय आजींचे नुकतेच निधन झाले. नातेवाईकांनी नाकारल्याने अखेर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
१९६५ मध्ये, म्हणजे तब्बल ६० वर्षांपूर्वी, कल्याण न्यायालयाच्या आदेशानुसार या आजीला तिच्या आईने ठाणे मनोरुग्णालयात दाखल केले. पण त्यानंतर ना आई परत आली, ना भाऊ, ना कुठलाच नातेवाईक. रुग्णालयाने वेळोवेळी नातेवाईकांचा शोध घेतला. भावाशी संपर्क झाला तेव्हा त्याने थेट सांगितलं- “मी तिला दाखल केलं नाही, त्यामुळे मी घेऊन जाणार नाही.” नंतर ते पुन्हा कधीच आले नाहीत.
वॉर्ड क्रमांक १२ त्यांचं घर झालं होतं. त्या स्वतःची कामं शक्य तितकी स्वतः करत. इतर रुग्णांशी संवाद साधत, प्रेमाने बोलत. त्यांच्या डोळ्यांनी पाहणं थांबवलं, पण मन मात्र नेहमी जागं राहिलं. दरम्यान, आजींबाईंना विविध आजारांनी ग्रासले. २००८ पासून उच्च रक्तदाब, त्यानंतर हायपर थायरॉईड, डोळ्यांचं अंधत्व…असे आजार त्यांना झाले. मनोरुग्णालयाच्या सर्व टीमने स्वतःच्या आजीप्रमाणे सुश्रुषा केली
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या आजीची देखभाल सुरूच होती. त्यांच्या उपचारासाठी डॉ. रुचा जोशी, डॉ. शमा राठोड, डॉ. शोभना चव्हाण, डॉ. निशा तडवी, डॉ. वृषाली चव्हाण, डॉ. कल्पना माले, डॉ. प्रज्ञा बराळ यांनी सातत्याने उपचार दिले परिसेविका रीना वासुदेव, परिचारिका सुमन गोरडे, प्रमिला भिरुड, कविता गावित, वॉर्ड सेविका भारती कुरकुटे, संगीता कोकरे यांनी त्यांचं तितक्याच ममतेने संगोपन केलं. समाजसेवा अधीक्षक निलीमा केसरकर आणि ब्रह्मदेव जाधव यांनी नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना रुग्णाच्या डिस्चार्ज बाबत वारंवार पाठपुरावा समुपदेशन व मार्गदर्शन केले. परंतु शेवटपर्यंत नातेवाईकांनी प्रतिसाद दिला नाही.
जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा पुन्हा एकदा भावाला कळवण्यात आले. मात्र त्याचे उत्तर आले-“मृतदेह घ्यायला येणार नाही. देहदान करा किंवा जे करायचं ते करा.” अखेर ज्या रुग्णालयाने त्यांना ६० वर्षे सांभाळले, त्या मनोरुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या सहकार्याने अंत्यसंस्कार केले.
या रुग्णांशी आमचे रक्ताचे नाते नसले तरी मनाच्या धाग्यांनी जोडलेले खरे नाते म्हणजे सेवा, स्नेह आणि सहवासाचे. ठाणे मनोरुग्णालयाचे आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देण्याचा कायमच प्रयत्न करतात, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.