ठाणे: घोडबंदर मार्गांवरील मेट्रोच्या कामासाठी आणलेल्या सिमेंट मिक्सरला अवजड वाहनाने पहाटे ४.३०ला दिलेल्या धडकेमुळे घोडबंदर मार्गांवर सुमारे सात तास घोडबंदरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
ठाणे घोडबंदर मार्गांवर ब्रह्माण्ड सिग्नल येथे मेट्रो ट्रॅक कॉन्ट्रॅक्टर यांचे ट्रॅक प्लास्टर करायचे काम बुम क्रेन मशीन व सिमेंट मिक्सर वाहन रस्त्यावर बेरीकेट लावून सुरु होते. त्याकरिता बाजूने दोन मार्गीका सुरु होत्या. त्यावेळी एका अवजड वाहनाने सिमेंट मिक्सरला धडक दिल्याने मिक्सर बूम क्रेनवर जाऊन आदळल्याने बूम क्रेन ऑपरेटर जखमी झाला, त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु अपघातामध्ये बूम क्रेनची तेलगळती झाली, त्यामुळे 200 मीटर अंतरावर पुढे एक ओडिसी वाहन व एक अवजड वाहन सांडलेल्या तेलावरून घसरून अपघात झाला. त्यामध्ये ओडिसी वाहन हे ठाण्याच्या दिशेने त्याचे तोंड फिरले. त्यावेळी तेथून एकच लाईन पास होत होती. त्या ओडिसी वाहनाचा पुलर हा नादुरुस्त झाल्याने दुसरा पुलर बोलावून तो नादुरुस्त ओडिसी वाहन व अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर बूम क्रेनला धडक देणारे मिक्सर वाहन हे हायड्रा क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यावेळी दोन लाईन वाहतूक चालू होती. नमूद बूम क्रेनचा ऑपरेटर हा जखमी असल्याने दुसरा तज्ञ ऑपरेटर बोलावून बूम वाहन दुरुस्त करण्यात आले. मात्र बूम क्रेनमध्ये ऑइल नसल्याने ती क्रेन ऑपरेट होत नसल्याने 200 लिटर ऑइल मागवून त्या बुम क्रेनमध्ये टाकून बूम क्रेन चालू करून, हटविण्यात आली. दुपारी १ वाजता रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण खुला करून वाहतूक नियमन करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ठाणे मनपा आपत्ती निवारण कक्षाच्या पथकाने रस्त्यावरील ऑइल काढण्यासाठी पाणी फवारणी करून, वाळूमाती टाकून रस्ता वापरण्यायोग्य केला होता. या अपघातामुळे जाम झालेला रस्ता मोकळा करण्यासाठी सात तास लागले.