५० वाहनांकडून एक लाखांचा दंड
ठाणे: शहरात ओला, उबरसारख्या अॅपवर आधारित टुरिस्ट टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक सेवांचा वापर झपाट्याने वाढत असतानाच अनेक वाहन चालकांकडून वाहतूक व परवाना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवून ५० ओला, उबर टॅक्सी व बसगाड्यांवर कारवाई करत तब्बल एक लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे.
प्रवाशांना तत्काळ सेवा पुरवण्याच्या नावाखाली नियमभंग करणाऱ्या टॅक्सी व बसगाड्या रस्त्यावर मुक्त संचार करत असल्याचे निदर्शनास येताच, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरातील विविध मुख्य मार्ग, चौक आणि वाहतुकीच्या गर्दीच्या ठिकाणी कडक वाहन तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे.
घोडबंदर रोड, तीन हात नाका, भिवंडी आदी ठिकाणी तपासणी दरम्यान अनेक वाहनचालकांकडे मूलभूत कागदपत्रांचा अभाव असल्याचे, तर काहींचे परवाने कालबाह्य झालेले असल्याचे आढळले. काही वाहनचालकांकडून परमिटचा सर्रास गैरवापरही होत असल्याचे उघड झाले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर तत्काळ दंडात्मक कारवाई करत सर्वच वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे.या मोहिमेमुळे ठाण्यात नियमबाह्य टॅक्सी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सामान्य प्रवाशांनीही वाहन सेवा वापरताना परवाना व कागदपत्रांची चौकशी करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत, नियमबाह्य व बोगस सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर विभागाची कारवाई भविष्यात अधिक तीव्र होणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.