अतिक्रमण विभागाकडून किरकोळ कारवाई
ठाणे: शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेच्या राखीव मोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे आणि चाळीचे बांधकाम तोडण्याची थातूरमातुर कारवाई करुन अतिक्रमण विभागाने उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याची चर्चा या भागात सुरु झाली आहे. हे सम्पूर्ण बांधकाम जमीनदोस्त करुन भूखंड मोकळा केला नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेचे शास्त्रीनगर विभागात मोक्याच्या जागी मोकळे भूखंड आहेत. या भूखंडांवर भूमाफियांची गेल्या अनेक वर्षांपासून नजर आहे. या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी बारीक नजर ठेवली आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, डीपी रोडचे या भूखंडावर नियोजन आहे. तसा कार्यादेश देखिल देण्यात आला आहे. मात्र तरी सुद्धा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम होत असल्याने गतवर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये स्थानिकांनी हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता.
अतिक्रमणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पालिका प्रशासनाला निष्कासनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पायमल्ली करत भूमाफियांना मोकळे रान दिले आहे, असा आरोप श्री. जगदाळे यांनी केला होता. त्यानंतर काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने थातूरमातुर कारवाई केली. नव्याने सुरु असलेल्या बांधकामाच्या चार भिंती तोडण्याची कारवाई केली, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या जागेवरील बांधकाम, नाल्यावरील चाळी यांना मात्र हात लावण्यात आला नसल्याबद्दल श्री.जगदाळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. न्यायालय अनधिकृत बांधकामावरून महापालिकेचे वाभाडे काढत असतानाही अधिकारी या बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप श्री.जगदाळे यांनी केला आहे.