ठामपा निवडणुकीचा बार उडणार पुढच्या वर्षी!

राज्यात तीन टप्प्यांत होणार निवडणुका

ठाणे: ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजे २०२६ची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्राने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागिल आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता. राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्रे कमी पडण्याची शक्यता असल्याने निवडणुका या तीन किंवा चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात पंचायत समिती आणि नगर पंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपालिका यांच्या निवडणूक होऊन मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला पुढील वर्ष म्हणजे २०२६चा फेब्रुवारी/मार्च उजाडण्याची शक्यता निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले असून प्रभाग रचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपविण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे. निवडणूक आयोग १ जुलै २०२५ विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत तसेच आरक्षण सोडत देखिल काढली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे २०२६च्या फेब्रुवारी/मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे.