बाजार समितीची १७५ एकर जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव

नवी मुंबई: अपुरी जागा आणि वाहतूक कोंडीचे कारण देत मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारासाठी इतरत्र नवीन जागेचा शोध घेऊन बाजार स्थलांतरित करण्यासाठी चाचपणी सुरू असून याला काही बाजार घटकांचा पाठिंबा आहे. मात्र बाजार स्थलांतर करून येथील १७५ एकर जागा खाजगी विकासकांच्या घशात घालून स्वतःचे चांगभलं करण्याचा डाव काही घटकांनी आखला असल्याची चर्चा सध्या बाजार आवारात सुरू आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी पाहता येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १९८२ साली नवी मुंबईत स्थिरावली. मात्र बाजार आवारातील सर्व इमारती धोकादायक अवस्थेत गेल्या असून पुनर्विकासाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बाजार समितीच्या १७५ एकरवर काही विकासकांचा डोळा पडला आहे.

नवी मुंबई शहरात जागेला सध्या तीन लाख प्रति चौरस मिटर भाव असून तयार सदनिकांना १२ हजार ते १८ हजार चौरस फूट भाव मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा सध्या विकासकांमार्फत पुनर्विकास सुरू असून या घरांना मागणी वाढत आहे. वाशीमधील घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याने विकासक वाशी परिसरातील जागांना अधिक प्राधान्य देत आहेत.

बाजार समितीची एकुण सात लाख चौरस मीटर जागा असून त्याचे मूल्य २१ हजार कोटी आहे. त्यामुळे येथील बाजार आवार इतरत्र स्थलांतर करून जागा खाजगी विकासकांच्या घशात घालून स्वतःचे चांगभलं करण्याचा डाव काही जणांनी आखला असल्याची जोरदार चर्चा बाजार आवारात सुरू आहे.

वाशीतील एपीएमसी बाजार आवार इतरत्र स्थलांतर करण्याबाबत एपीएमसी प्रशासनाने आम्हाला चर्चेस आमंत्रित केले होते. मात्र बाजार आवार इतरत्र स्थलांतर करण्यास आमचा विरोध आहे, असे फळ व्यापारी बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.