पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस ५९५० विद्यार्थी
नवी मुंबई: महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेस नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील ५९५० विद्यार्थी बसले. यातील २३९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले तर यातील ४७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
महापालिका शाळांतील इयत्ता पाचवीचे 2441 विद्यार्थी व इयत्ता आठवीचे 3509 विद्यार्थी असे एकूण 5950 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवीचे 851 विद्यार्थी व इयत्ता आठवीचे 793 विद्यार्थी असे एकूण 1644 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळांमधील इयत्ता पाचवीच्या 129 व इयत्ता आठवीच्या 110 अशा एकूण 239 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवीच्या 25 विद्यार्थ्यांना व इयत्ता आठवीच्या 22 विद्यार्थ्यांना अशा एकूण 47 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त झाले आहे.
नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली येथील स्वराली जगधने (इयत्ता 8 वी) हिने महापालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला असून ठाणे जिल्हयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभ्रा गायकवाड (इयत्ता 5 वी) या विद्यार्थिनीने नमुंमपा शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणा-या स्वराली व शुभ्रा तसेच सर्वच गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.