घोडबंदर मार्गावर खड्डे; कोंडीने परिसर हैराण

मेट्रोचे झाले थोडे…

ठाणे : घोडबंदर मार्गांवर मेट्रो आणि काँक्रीटीकरणामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या घोडबंदरवासींना आता रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

मेट्रो, सेवा रस्त्याचे विस्तारिकरण यामुळे घोडबंदर मार्गांवर वाहतूक कोंडी दरदिवशी होत असते. वाहतूक पोलिस वाहनांचे संचलन करत असतात, परंतु मागिल काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्याचा सामना करताना घोडबंदरवासींची डोकेदुखी आणखी वाढली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असतानाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली होती. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा या मार्गांवर लागल्या होत्या. कासारवडवली येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून गाड्या हाकाव्या लागत आहेत.

ठाणे शहरात दोन मंत्री असतानाही रस्त्याची अशी दुरावस्था झाली असून त्याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित येऊन दर्जेदार काम करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.