* विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने प्रशासन ठिकाणावर
* ठाणेवैभव इम्पॅक्ट
शहापूर: शाळेत येण्या-जाण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने शहापूर तालुक्यातील धसई हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनी धसई फाट्यावर एसटी बस रोखून धरत आंदोलन केले होते. याबाबतचे वृत्त ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध होताच परिवहन वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळे शहापूर आगार प्रशासनाची नामुष्की समोर आली होती. दरम्यान एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांना स्वतंत्र बसची व्यवस्था केली.
शहापूर तालुक्यातील सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याचीवाडी व जळक्याचीवाडी या भागातून धसईकडे शाळेत येणाऱ्या ६५ ते ७० विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रशासनाने एस.टी.बस उपलब्ध करुन न दिल्याने शालेय विद्यार्थ्यांनी धसई या ठिकाणी बससमोर बसून आंदोलन केले होते.
शहापूर-कोठेरा मार्गावरील एसटी बस वेळेवर येत नसल्यामुळे तालुक्याच्या या पट्ट्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकदा विनंती करूनही याची दखल घेतली जात नसल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘बस वेळेवर आल्याच पाहिजेत, बस फेऱ्या वाढवल्याच पाहिजेत’ अशा घोषणा देत बस रोखून धरली. पर्यायाने तालुक्याच्या विविध भागातील विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यात विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थी व नागरिकांनी अनेकदा प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार केला होता. परंतु याची कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
तथापि ठिकठिकाणी बस बंद पडणे, एसटीचा पत्रा बाहेर निघणे, बसमध्ये कर्कश आवाज येणे, सिग्नल लाईट नसणे, हेड लाईट नसणे, प्रवाशांना बसण्याची आसन व्यवस्था अस्वच्छ व मोडलेली असणे अशा विविध कारणांनी लालपरी बदनाम होतांना दिसत आहे.
आम्हाला शाळेत येण्या-जाण्यासाठी बसमध्ये जागा उपलब्ध होत नसायची, यामुळे पाच ते सहा किलोमीटर आम्हाला पायी चालत जावे लागायचे. आता बसची व्यवस्था केल्याने आम्हाला शाळेत येणेजाणे सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया पोकळ्याची वाडी येथील विद्यार्थी प्रेम गिऱ्हा याने दिली.
शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना आता स्वतंत्र एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे शहापूर आगार व्यवस्थापक एम. एम. शेळके यांनी सांगितले.