पालघर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत क्रिश आणि इयानचे दुहेरीत वर्चस्व

राष्ट्रीय स्पर्धेत मयांक राजपूतने गाठली मुख्य फेरी

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची दुहेरी घवघवीत कामगिरी

ठाणे : ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, प्रशिक्षणाची सखोलता आणि खेळाडूंच्या मेहनतीची झलक विविध स्पर्धांमध्ये दाखवत एकाच वेळी जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे.

पालघर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये क्रिश देसाई आणि इयान लोपेझ यांनी पुरुष दुहेरी गटात जबरदस्त खेळ करत अंतिम सामन्यात मल्हार गडी आणि निधीश मोरे यांचा २१-११, २१-१० असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

या विजयाच्या आधी उपांत्य फेरीत त्यांनी आदित्य पांडे आणि लव सूर्यवंशी यांचा २१-९, २४-२२ असा रोमहर्षक सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
या स्पर्धेत क्रिश देसाईने एकेरी गटात उपविजेतेपदही पटकावत आपली अष्टपैलू खेळपट्टी सिद्ध केली. दोन्ही प्रकारात सातत्याने दिलेली कामगिरी ही त्याच्या मेहनती आणि अनुभवाची साक्ष आहे.

दरवर्षी देशभरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी अत्यंत स्पर्धात्मक ठरणारी ऑल इंडिया सब-ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा (अंडर-१५ बॉईज सिंगल्स) यंदा गोव्यात आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेच्या पात्रता फेरीत १०२४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेतून स्वतःचा मार्ग बनवत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा मयांक राजपूत याने थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळवत ठाण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. पात्रता फेरीत त्याने पहिल्या सामन्यात प्रगुन विश्वनाथनचा १५-९, १५-८ असा पराभव करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात शिवांश पब्बू याला १५-११, १५-११ अशा सेट्समध्ये नमवले. पुढच्या फेरीत त्याने विशाल आनंद याच्यावर १५-६, १५-१२ असा विजय मिळवला, आणि त्यानंतर ओमकार आर. के. याच्यावर १५-९, १५-१० असा दणदणीत विजय मिळवत पात्रता फेरीतील सर्व सामने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. मुख्य फेरीत त्याची लढत दुसऱ्या मानांकित हर्षित खत्रीशी झाली, ज्यामध्ये त्याने ११-२१, १२-२१ अशा सेट्समध्ये लढा दिला.

या यशामागे मयांकच्या सातत्यपूर्ण सरावासोबतच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने सुरू केलेल्या वार्षिक इंडोनेशिया प्रशिक्षण उपक्रमाचा मोठा वाटा आहे. इंडोनेशियातील अत्युच्च दर्जाच्या अकॅडमीत प्रशिक्षकांकरवी मिळणारे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय खेळाच्या पातळीवरचा अनुभव हे खेळाडूंना नव्या क्षितिजांकडे नेण्याचे कार्य करत आहेत.

ठाणे महानगरपालिका क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी या यशस्वी खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी कामगिरीबद्दल अकादमीच्या प्रशिक्षक व व्यवस्थापनाचेही कौतुक करण्यात आले आहे.