* मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
* ठाणे पोलीस आयुक्तांनी केली इमारतीची पाहणी
अंबरनाथ : येथील अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्यात आले असून, बांधण्यात आलेल्या सुसज्ज पोलीस इमारतींचे उदघाटन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नुकतीच केली दोन्ही इमारतींची पाहणी केली.
परिमंडळ चार अंतर्गत येणारे अंबरनाथ पोलीस ठाणे व हिललाईन पोलिस ठाणे इमारत जीर्ण झाल्या होत्या. धोकादायक इमारतीमध्ये पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या पोलिसांसाठी सुसज्ज इमारती बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने अंबरनाथ पोलीस ठाणे, हिललाईन पोलीस ठाणे आणि कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे या इमारतींसाठी 16 कोटी 50 लाख रुपयांचे बांधकाम टेंडर प्रसिद्ध केले होते.
या तिन्ही पोलीस ठाण्याच्या इमारती पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठीच या इमारतीची पाहणी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नुकतीच केली. पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर डुंबरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक सुचनाही केल्या. नवीन सुसज्ज इमारती पोलीस ठाण्यासाठी मिळणार असल्याने पोलिसांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.