दोन दिवस मुसळधारेचे; ठाणे-पालघरला इशारा

मुंबई : हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, तर मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईतील उपनगरात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. या भागात पावसाचा जोर जास्त असेल.

वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच वाऱ्याचा वेगही अधिक आहे. परिणामी, संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने आज पालघरसाठी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) आणि मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. याचा परिणाम म्हणून उपनगरांत सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याने सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत १४२.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, मोसमी पावसाने मंगळवारी संपूर्ण राज्य व्यापले. तसेच सध्या पावसाला पोषक वातावरण असल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतही मागील दोन तीन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे.

ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सागरी किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. आज रात्री ११.३० पर्यंत हा इशारा लागू आहे. या कालावधीत समुद्र किनाऱ्यावर ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी परिसरात पर्यटकांना अटकाव करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.