ठाणे: ठाण्याच्या मानव मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे. ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता मोरे आणि परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांचा तो सुपुत्र आहे.
समुद्राचे थंड तापमान, अनियमित लाटा आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत मानवने १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली.
मानव मोरे हा मुलुंड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी असून वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. सध्या तो ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे सराव करत होता. अगदी लहानपणापासून पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातली प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे. पण हे यश फक्त मानवचेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक, प्रशिक्षक कैलास आखाडे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे आई-वडील यांचा तितकाच मोलाचा वाटा आहे. त्याचे हे यश अनेक नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारे आहे.