भादाणे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
पडघा: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील घटती पटसंख्या लक्षात घेता मराठी शाळा वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी करात ५० टक्के सवलत देण्याचा ठराव भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायतीने केला आहे.
जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी याकरिता सरपंच ज्योत्स्ना भालेकर, उपसरपंच मेघा भोईर, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर जाधव व ग्रामपंचायत कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत हद्दीतील भादाणे, जुपाडा, आतकोली, चिंबीपाडा, शेरेकरपाडा, या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास पालकांना त्यांच्या घरपट्टीत (मालमत्ता कर) ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पहिलं ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पाच रोपे देण्यात येणार असून त्यांची योग्य निगा राखून झाडे जगवल्यास पुढील वर्षी त्यांच्या पालकांना सुध्दा घरपट्टी (मालमत्ता कर) पाणीपट्टी (पाणीकर) यांच्यात ५० टक्के सवलत देण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
या ठरावाचे नागरीकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ग्रामपंचायत भादाणे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.