नालेसफाई असमाधानकारक; स्वच्छता अधिकारी निलंबित

आयुक्तांकडून कल्याण पूर्वेतील नालेसफाईची पाहणी

कल्याण : महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काल दिवसभरात कल्याण पूर्वेतील 4/जे आणि 5/ड प्रभाग क्षेत्रातील नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी नालेसफाई असमाधानकारक आढळून आल्याने स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

4/जे प्रभागात आयुक्तांनी लोकग्राम व मंगल राघोनगर या परिसरातील मध्यम नाल्यांची साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या नाल्यांची 65-70 टक्के साफ-सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. पुढील आठ दिवसांत प्रभागातील सर्व नाल्यांची साफ-सफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 5/ड प्रभागात आयुक्तांनी विजयनगर नाका व तिसगाव पाडा या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, 5/ड प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना निलंबित करण्यात आले.

नालेसफाई पाहणीपूर्वी महापालिका आयुक्त अभिनव आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली 4/जे आणि 5/ड प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीतील पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणेकामी, बैठक संपन्न झाली. या बैठकीत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवास मुक्त केलेल्या कुंटूबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिग्ज विरोधातील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.