* अंजुरफाटा येथे ६५ मीटर गर्डर लाँच
* मेट्रो ५चा महत्वाचा टप्पा यशस्वी
भिवंडी : मुंबई मेट्रोची पाचवी लाईन ठाणे ते भिवंडीमार्गे कल्याणपर्यंत जाणार असून सध्या भिवंडी धामणकर नाका ते कापूरबावडी हा टप्पा प्रगती पथावर आहे. मागील काही दिवसांपासून या मार्गावरील अंजूरफाटा येथील रेल्वे ट्रॅकवर गर्डर टाकण्याचे जटील काम सुरु असून हे काम येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळते.
भिवंडीकरांना गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि कल्याण येथे जाऊन रेल्वे गाठणे अत्यंत कठीण झाले असून भारतीय रेल्वेचे शहरातील भिवंडी रोड हे स्थानक देखील स्थानिक प्रवाशांना पूर्णवेळ रेल्वे सेवा देण्यास अपयशी ठरले आहे. त्यातच होऊ घातलेली एमएमआरडीएची मेट्रो-५ ही प्रवासी सेवा भिवंडीकरांच्या प्रवासाचा आणि प्रगतीचा एक महामार्ग ठरणार आहे. मुंबईच्या जवळ असणाऱ्या भिवंडी शहराकडे हळूहळू मुंबई-ठाण्यातील नागरिकांचा ओघ वाढू लागल्याने प्रवासी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच व्यापारी बाजारपेठ आणि व्यावसायिक सुविधा वाढत असल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जाणारे वाहतुकीचे मार्ग भिवंडीतून जात असल्याने या शहरावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे.
मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गावर भिवंडीतील कल्याणरोड येथे झालेल्या नागरिकांच्या विरोधामुळे मागील काही वर्षांपासून मेट्रोचे काम संथगतीने सुरु होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात भिवंडी-कल्याण मार्गावर भुयारी मार्गाला मंजुरी देत आर्थिक तरतूद केल्याने मेट्रो-५ च्या कामाने पुन्हा वेग धरला आहे. त्याच अनुषंगाने मागील काही दिवसांपासून अंजूरफाटा येथील या मुख्य वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या दोन चौकाच्या ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मोठे ऐतिहासिक कामगिरी पार पडली. त्यासाठी या मार्गावर अहोरात्र चालणारी वाहतूक चार दिवस रात्रीच्या वेळी बंद करण्यात आली. आणि अंजूरफाटा येथे रेल्वे ट्रॅक आणि महामार्ग यांच्या दोन बाजूला उभे असलेल्या उंच खांबावर तयार केलेले अभियांत्रिकी मॉडेल असलेले ६५ मीटर गर्डर लाँच केले गेले.
अंजूरफाटा येथे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांना जोडणारी रेल्वे वाहतुकीचा रेल्वे ट्रॅक आहे. त्यावरून नेहमी मालगाड्या, रात्रीच्या एक्सप्रेस गाड्या आणि दिवा-वसई लोकल मेमो गाडी जात असते. त्या रेल्वे ट्रॅकखालून महामार्ग गेलेला आहे. हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर नियमित होणारी वाहतूक कोंडी असते. अशा जटील स्थितीच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या पुढे व मागे असलेल्या उंच खांबावर ६५ मीटर गर्डर टाकणे हे मोठे दिव्यच होते. मुंबई मेट्रो लाईन-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) च्या पहिल्या टप्प्यात हा एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.
भिवंडीतील अंजूर फाटा येथे ६५ मीटर लांबीचा ओपन वेब गर्डर यशस्वीरित्या लाँच करण्यात आला. हा गर्डर मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर बसवण्यात आला आहे. या ठिकाणी तीन थर आहेत. या जटील रचनेला छेद देत हे काम केले गेले. खाली महामार्ग, मध्यभागी रेल्वे ट्रॅक आणि वर २० मीटर उंचीवर मेट्रो व्हायाडक्ट अशा स्थितीत रेल्वे ब्लॉक विंडो दरम्यान ४५६ मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर ठेवण्यात आला. या साठी रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी यासाठी योजना आखून चार दिवस रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्यांचे नियोजन केले. तसेच नेहमीची वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली आणि गडर टाकणाऱ्या तंत्रज्ञान,कामगार यांना सहकार्य केले. त्यानंतर हे गर्डर मेट्रो पिलर पी ३२८ आणि पी ३२९ दरम्यान बसवले आहे. या तांत्रिक यशामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती मिळणार आहे. तसेच निर्धारित वेळेत मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
मुंबई मेट्रो-५ प्रकल्पाचा खर्च ८४१६.५१ कोटी असून त्यामध्ये कर आणि इतर शुल्कांचा समावेश आहे. तसेच २०३१ पर्यंत या मेट्रो मार्गावरून दररोज अंदाजे ३.०३ लाख प्रवासी प्रवास करतील,असे सांगितले जाते. मुंबई मेट्रो लाईन-५ हा पूर्णपणे उंच कॉरिडॉर आहे ज्याची एकूण लांबी २४.९० किमी आहे. त्यावर एकूण १५ स्थानके असतील. ही मेट्रो लाईन मेट्रो लाईन-४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो लाईन-१२शी (कल्याण ते तळोजा) जोडली जाणार आहे. याशिवाय, ते मध्य रेल्वे नेटवर्कशी देखील जोडले जाईल. मेट्रो लाईन-५ सुरू झाल्यामुळे, ठाणे, भिवंडी आणि कल्याण दरम्यानच्या प्रवासात ५० ते ७५ टक्के वेळ वाचेल. या मेट्रोमुळे सरकारी कार्यालये, व्यावसायिक केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सहज पोहोचता येणार असल्याने भिवंडीला प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे.
भिवंडी-वसई मार्गाला जोडणारा माणकोली-अंजूरफाटा-चिंचोटीनाका या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्यातच येथील रेल्वे ट्रॅकखाली अरुंद रस्ता असल्याने नेहमी अंजूरफाटा येथील दोन वळणावरील चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असते. अशा स्थितीत येथे तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाने गडर टाकण्याचे मोठे काम झाले. त्यासाठी या मार्गावर लोखंडी मनोरा उभा केला आहे. त्यावर अजूनही काम सुरु असून हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होईल,अशी माहिती तंत्रज्ञानानी आम्हास दिली आहे. हे काम झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती नारपोली उप वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.