आ.संजय केळकर कर्मचारी हृदयसम्राट पुरस्काराने सन्मानित
विविध कर्मचारी संघटनांचा मेळावा तुडुंब गर्दीत
ठाणे: विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यासारखे आजार जडले आहेत. या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी, किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे मी कामगारांच्या न्याय-हक्कासाठी झटत आहे. हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदयसम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव मला आहे, अशा शब्दांत आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या.
कंपनी कामगार, ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महापालिकेतील पाच कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल, खारकर आळी, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदयसम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री.केळकर बोलत होते.
सन २००६ ला विधान परिषदेचा आमदार, २०१४ पासून विधानसभेचा सलग तीन टर्म आमदार या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बूट पॉलिश कामगार, तसेच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी काम करत आहे. मी कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केले नाही तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलो. बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले, वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले. पोयशा, मफतलालसारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले, देत आहे, त्यात यशही मिळत आहे. त्यांना मिळत असलेल्या न्याय-हक्कामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, त्याचे मला मोठे समाधान मिळते. जनतेने मला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणे हे मी माझे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले.
ठाणे महापालिकेतील विविध विभागातील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मोठा लढा देऊन मिळवून दिला. कामगार एकत्र असतील तरच त्यांना त्यांचे हक्क मिळतात. आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात फूट पाडणारे महाभागही सक्रिय होतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नेहमी सावध रहावे, असा सल्लाही श्री.केळकर यांनी दिला.
मी सुद्धा एकेकाळी कंपनीत पॅकिंग विभागात काम केले आहे. कामगारांच्या समस्यांची जाणीव मला आहे. त्या जाणीवेतून गेली अनेक वर्षे प्रशासनाशी कधी सामंजस्याने तर कधी आक्रमकपणे लढत आहे. कामगारांच्या जीवावर आस्थापना चालतात, त्यामुळे त्यांची अडवणूक झाली तर मी खपवून घेणार नाही, असा इशाराही श्री.केळकर यांनी व्यासपीठावरून दिला.
पाच कर्मचारी संघटनांच्या पुढाकाराने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचा तुडुंब गर्दीत झालेला मेळावा आजवरचा सर्वात मोठा मेळावा ठरला. ठाणे महापालिका कर्मचारी वर्गातर्फे दत्ता घुगे आणि अजित मोरे हे मुख्य आयोजक होते. तर या भव्य आयोजन समितीत क्रांती संघटना (ठाणे महानगरपालिका) अध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटना (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष लक्ष्मण पुरी, वाहनचालक संघटना (ठाणे महापालिका) हरिश्चंद्र देशमुख, महाराष्ट्र म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, धर्मवीर आरोग्य कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज परब यांचा समावेश होता. संघटनांच्या प्रमुखांनी आमदार संजय केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
केळकर साहेब प्रत्येकाच्या
घरातील आमदार-आ.डावखरे
सर्वसामान्य नागरिक असो, कामगार असो कोणीही असो, त्याचा फोन आमदार संजय केळकर हे जातीने घेतात, त्याच्याशी बोलतात. त्यामुळे लोकांना ते त्यांच्या घरातीलच आमदार वाटतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ते शांत-संयमी भूमिकेतून वाटाघाटी करतात. अडवणूक होत असेल तर ते रुद्रावतार देखील घेतात. स्वच्छ प्रतिमा असल्याने अधिकारी वर्गात त्यांचा चांगलाच दबदबा आहे, अशा शब्दांत प्रमुख अतिथी आमदार निरंजन डावखरे यांनी श्री.केळकर यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील, महेश कदम, डॉ.अमोल गीते आदी उपस्थित होते.