खुल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत एकूण नऊ पदकांची कमाई
ठाणे: मुंबई येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे गौतम ठक्कर स्मृती राज्यस्तरीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा 11, 13 आणि 15 वर्षाखालील गटातील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातील हरहुन्नरी आणि उभरत्या चिमुकल्या खेळाडूंनी उत्तम प्रतिसाद दिला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास जगविख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
2024 पासून लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अव्वल ठरलेल्या आणि आत्तापर्यंत चारवेळा सुवर्णपदक पटकावून संपूर्ण राज्यात दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या अल्फी एम या खेळाडूने पुन्हा एकवार आपल्या चमकदार कामगिरीने या स्पर्धेत देखील 13 वर्षाखालील एकेरीच्या गटात मुलांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच चिमुकला अल्फी हा वरचढ ठरत होता. त्याने रियांश भालेकर या खेळाडूचा 15-5, 15-1 असा सहज पराभव करीत उप-उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत त्याने देवांश पांडे याचा पराभव केला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. उपांत्य फेरीच्या लढतीत कावी मेहता या खेळाडूचा त्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत अजिंक्य देसाई याला 21-19, 21-9 असे एकहाती नमवीत आपल्या सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली.
दहा वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या गटात तोयश दास याने कांस्यपदक पटकावले आहे.
अकरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची उभरती खेळाडू शनाया तवाते हिने सुद्धा लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत राज्यस्तरीय दर्जाचे सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. अंतिम फेरीच्या लढतीत शनायाने कनका इंदलकर या खेळाडूचा पराभव केला आणि आपल्या अजिंक्य पदाची सुनिश्चिती देखील केली. त्याचप्रमाणे १३ वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या गटात नावमी पॉल तिने देखील कांस्यपदक पटकावले आहे. १५ वर्षाखालील एकेरीच्या मुलांच्या गटात मयंक राजपूत याने आपल्या कारकीर्दीतील पहिले वहिले राज्यस्तरीय रौप्य पदक आपल्या नावे केले आहे.
१५ वर्षाखालील दुहेरीच्या गटात चंद्रांशू गुंडले आणि शारव शहाणे यांनी पहिल्यांदाच एकत्र खेळताना रौप्य पदक पटकावण्याची किमया साध्य केली आहे.
ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मीतेश हाजीरनीस, राजीव गणपुले, विघ्नेश देवळेकर, कबीर कंझारकर यांच्यासोबतच लहान मुलांच्या टेक्निक आणि स्ट्रोक्सवर विशेष प्रशिक्षण घेणारे श्रीकांत भागवत, अमित गोडबोले प्रसेनजी शिरोडकर, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी अशा संपूर्ण टीमचे कौतुक करीत उपायुक्त मीनल पालांडे यांनी पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.