३० लाखांपासून तीन कोटीपर्यंतची घरे एमसीएचआयच्या प्रदर्शनात

लाडक्या बहिणीलाही विशेष सवलत

ठाणे : येत्या ७ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील हायलँड मैदानात सुरू होणाऱ्या क्रेडाई एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३० लाखांपासून तीन कोटी रुपये किमतीची घरे असणार आहेत. विशेष करून घरांची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या लाडक्या बहिणीला विशेष सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरुवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, यावेळी बहिणींना नेमकी सवलत काय दिली जाणार आहे, हे मात्र मेहता यांनी गुपित ठेवले आहे. तर, या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष मेहता यांच्यासह उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा आणि जय वोरा उपस्थित होते.

ठाण्यातील एमसीएचआय-क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाणार आहे. या प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार असून मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. याशिवाय ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून प्रदर्शनस्थळापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले.

यंदाच्या प्रदर्शनात ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. यामुळे प्रदर्शनात ३० लाखांपासून पुढे तीन कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील, असेही मेहता म्हणाले. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे.

याशिवाय, यावेळी स्पर्धा ठेवल्या जाणार असून त्यातील विजेत्यांना दीड लाखांपासून ते ७५ हजारांची अशी तीन पारितोषिके दिली जाणार आहेत अशी माहिती मेहता यांनी दिली.