यंदा ‘माघी’ उत्सवाचा ‘कडाका’

५०० घरगुती गणपती वाढले

ठाणे: भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघी गणेशोत्सव थाटात साजरा करण्याचा कल वाढत चालला आहे. कुणी परंपरेनुसार तर कुणी नवस फेडायला गणपती बाप्पाला विराजमान करत असल्यामुळे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करणार्‍यांच्या संख्येत भर पडत आहे.

यंदाच्या वर्षीही यामध्ये शेकडोंच्या संख्येने भर पडली असून ठाणेकर यासाठी सज्ज होत आहेत. यावर्षी गणेश जयंतीला म्हणजे १ फेब्रुवारीला ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये २४१९ श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक २२६१ मूर्तींची स्थापना घरी होणार असून १५८ सार्वजनिक मंडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. गेल्यावर्षीची तुलना केल्यास यावर्षी गणेशमंडळांची संख्या नऊने तर घरगुती गणपतींची संख्या ४८५ ने वाढली आहे.

यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शनिवारी १ फेब्रुवारीला दुपारी ११ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होणार असून चतुर्थी तिथी २ फेब्रुवारीला रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी संपणार आहे. गणपती मूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्याने आणि अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार आहेत. त्यामुळे भटजींपासून देखावा, पुजाअर्चाच्या सामानांची जुळवाजुळव करण्यात चाकरमानी व्यस्त झाले आहेत.

विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात जसा थाटामाटात श्री गणेशाची पूजा, आरास सजवली जाते तसेच भव्य स्वरुप देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात फुलांपासून पर्यावरणपुरक मखरांनाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे गणेश मंडळांमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे. बाप्पाच्या बैठकीसाठी भव्य मंडप, महाल ठिकठिकाणी उभारले जात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून माघी गणपतीला नवसाचे स्वरुपही प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहूतेक जण दीड दिवसांच्या बाप्पाच्या पाहुणचाराला पसंती देतात. गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधीवत पूजा केली जाते तशीच पूजा माघी गणपतीला केली जाते. यावर्षीही घरी स्थापन होणार्‍या २,२६१ पैकी १५२९ बाप्पा दीड दिवस पाहुणचार घेणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांचे वेध लागल्यामुळे े अनेक गणेश मंडळांना राजकीय पक्षांकडूनही देणग्या मिळत असल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल-ताशे, लेझिम पथकांनाही प्राचारण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील गणेश मंदिरेही फुलांनी सजवली जाणार आहेत. बाप्पाचा ‘हॅपी बर्थ डे’ करण्यासाठी बाळगोपाळही उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.

आयुक्तालयात स्थापन होणार्‍या गणेशमूर्ती
ठाणे-घरगुती ३५६ तर सार्व. २२, भिवंडी-घरगुती ७७६ तर सार्व. ६, कल्याण-घरगुती ७०५ तर सार्व. ६६, उल्हासनगर-घरगुती २५९ तर सार्व. ३३ आणि वागळे-घरगुती १६५ तर सार्व. ३१

चौकट
दिवस घरगुती सार्वजनिक
दिड दिवस १५२९ ३८
पाच दिवस ५७३ ७६
सहा दिवस १० ०२
सात दिवस ११० २७
१० दिवस ३९ ०६
११ दिवस ०० ०१