माजी महापौर अशोक राऊळ यांचे निधन

ठाणे: महापालिकेचे माजी महापौर तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शांत, संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून राऊळ यांचा नावलौकिक होता. १९९१-९२ मध्ये त्यांनी ठाण्याचे महापौरपद भूषवले होते. त्यांच्यावर सोमवारी सकाळी जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, भाचे, पुतणे असा परिवार आहे.

अशोक राऊळ मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. खोपट येथील हंसनगर या भागातून आपल्या राजकीय कारकीर्दीला त्यांनी सुरुवात केली. राऊळ हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाऊ म्हणून परिचित होते. ठाणे नगरपालिका असल्यापासून राऊळ यांनी नगरसेवकपद भूषवले होते. काँग्रेस पक्षाने १९९१-९२ मध्ये त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी दिली. ठाणे महापालिकेचे पाचवे महापौर म्हणून त्यांनी उत्तमरीत्या काम पहिले. पुढे १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर अशोक राऊळ यांनी शरद पवार यांना साथ दिली. १९९९ साली त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे २०१७ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाकडून प्रभाग क्रमांक १२ मधून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते.

एक उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. महासभेतील त्यांची अनेक भाषणे गाजली. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पावरील त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण असायचे. त्यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या सुचनांचा अंतर्भाव प्रशासन आवर्जून करत असत. सर्वपक्षीय राजकारणाबरोबरच अशोक राऊळ यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षात असूनही शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना जनतेच्या प्रश्नांविषयी तळमळ होती. जनतेचे प्रश्न ते हिरीरीने महासभेत मांडत असत. दरम्यान, आजारी असल्याने राजकारणापासून ते थोडे दूर होते.

सर्वपक्षीय राजकारणाबरोबरच अशोक राऊळ यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षात असूनही शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी त्यांचे जिव्हाळाचे संबंध होते. त्यांना जनतेच्या प्रश्नांविषयी तळमळ होती. जनतेचे प्रश्न ते हिरीरीने महासभेत मांडत असत. दरम्यान, आजारी असल्याने त्यांनी राजकारणापासून थोडे दूर होते. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेवक नारायण पवार, बापू गायकर, विविध पक्षातील राजकीय नेते, ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.