अंबरनाथला फूटपाथ, रस्ता अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई

अंबरनाथ: अंबरनाथला रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण खात्याने कारवाई केली.

मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या आदेशाने अंबरनाथ नगरपालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकाने शहराच्या पूर्व भागातील स्थानक परिसरात असलेल्या फेरीवालांवर धडक कारवाईची मोहीम आज गुरुवारी हाती घेतलेली आहे.कारवाईने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहराच्या पूर्व व पश्चिम भागातील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी बस्थान मांडल्याने नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरपालिकेला तक्रार दिल्याने मुख्याधिकारी पराडकर यांनी फुटपाथ व रस्ते अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई धडक मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर संखे यांच्या पथकाने आज धडक कारवाई करून फेरीवाल्यांना दणका दिला.

पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वेल्फेअर सेंटर व हुतात्मा चौक दरम्यान फूटपाथ व रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत सुमारे २५ फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांची हातगाडी व विक्रीचे सामान जप्त केले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या आदेशानुसार फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील आठ दिवस ही कारवाई दोन्ही भागात सुरू राहिल, असे नरेंद्र संखे यांनी सांगितले.