थकबाकी न भरल्यास १५० बस गाड्याच रस्त्यावर धावणार
ठाणे: ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून परिचलनापोटीची कोरोना काळापासूनची तब्बल ५२ कोटींची थकबाकी आहे. परिणामी कंपनीमार्फत चालवण्यात येणाऱ्या तब्बल २४० बसेस कधीही बंद ठेवण्याची पाळी परिवहन प्रशासनावर येण्याची चिन्हे आहेत. अशी परिस्थिती ओढवल्यास रस्त्यावर टीएमटीच्या ३८० पैकी केवळ १५० बसेसच रस्त्यावर धावू शकणार आहेत. परिणामी सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे.
ठाणे परिवहन सेवा ही सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. आजच्या घडीला टीएमटीच्या तब्बल ३८० पेक्षा अधिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. तर या बसेसमधून जवळपास पावणे तीन लाख प्रवासी हे दररोज प्रवास करतात. परिवहनच्या ताफ्यात ४०० पेक्षा अधिक बसेस असून यामध्ये ३८० बसेस रस्त्यावर धावतात. यामध्ये जवळपास २४४ बसेस हे खाजगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात येत असून वाहक आणि चालक संबंधित कंपनीच्या माध्यमातून पुरवले जातात. मात्र कोरोनापासून संबंधित कंपनीची तब्बल ५२ कोटींची थकबाकी असून ही थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही. यासंदर्भात संदर्भात संबंधित कंपनीसोबत परिवहन प्रशासनाची चर्चा सुरु असून यामध्ये थकबाकी मोठ्या प्रमाणात थकल्याने थकबाकी लवकर भरा अन्यथा २४० बसेस चालवणे कठीण होणार असल्याचा इशाराच कंपनीने दिला आहे.
असे झाल्यास सध्या रस्त्यावर धावत असलेल्या ३८० बसेसपैकी २४० बसेस जर रस्त्यावर धावल्या नाहीत तर केवळ १५० बसेसच रस्त्यावर धावणार असून यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे मात्र चांगलेच हाल होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून अनुदान स्वरूपात काही तरी मदत करावी अशी परिवहन प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाचे ३८ कोटींचे अनुदानही लालफितीत
थकबाकीचा हा गुंता सोडवण्यासाठी परिवहन प्रशासनाने राज्य शासनाकडून ३८ कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. यासंदर्भात शासनाकडून अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. मात्र हे अनुदानही लालफितीत अडकले असून राज्याच्या अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. शासनाचे हे अनुदान ठाणे परिवहन सेवेला मिळाल्यास परिवहन प्रशासनाला मोठा दिलासा मिळू शकेल.