तब्बल चार दशकानंतर ऐतिहासिक निकाल
कल्याण : ऐतिहासिक कल्याण नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्याच मालकीची असण्यावर शिक्कामोर्तब करत या दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनेच्या मालकीचा दावा न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील ॲड.सचिन कुलकर्णी यांनी पत्राकारांना दिली.
कल्याण न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना, भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळापासून दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबतचा हा खटला सुरू होता. याठिकाणी असणारे मुस्लिमधर्मियांचे प्रार्थनास्थळ असल्याचे सांगत मुस्लिम समुदायाच्या वतीने मजलिस ए मुशावरा ट्रस्टकडून दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर मालकी हक्क सांगण्यात आला होता.
मात्र कल्याण न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून मुदतबाह्य कालावधीत हा दावा दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांचा मालकी हक्क फेटाळून लावला. आणि दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्याच मालकीची असल्याच्या मुद्द्यावर शिक्कमोर्तब केल्याची माहिती सरकारी वकील ॲड सचिन कुलकर्णी यांनी दिली.