अंबरनाथचा दिव्यांग मुंब्र्यात करतो आव्हाडांचा प्रचार

ठाणे: सामाजिक समतेसाठी आणि गोरगरिबांच्या हितासाठी लढणारे एकमेव नेतृत्व सध्या महाराष्ट्रात आहे. अन् या नेतृत्वाचे नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड! आपण त्यांचे मतदार नाही. परंतु, माणुसकी जीवंत ठेवण्यासाठी मी त्यांचा प्रचार करायला अंबरनाथहून येत आहे, असे सांगत एक दिव्यांग गेले पाच दिवस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा प्रचार करीत आहे.

जाॅन जोसेफ असे या दिव्यांगाचे नाव आहे. मूळचा अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) येथील असलेला जाॅन जोसेफ गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ येथील फाॅरेस्ट नाका येथे वास्तव्यास आहे. केवळ डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या विचारधारेवर प्रेम करीत असल्यानेच आपण त्यांचा प्रचार करीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. जाॅन जोसेफ याने आपल्या तीन चाकी सायकलवर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाचा बॅनर लावला असून नाक्यानाक्यावर थांबून लोकांशी संवाद साधून एक नंबरचे बटन दाबण्याचे आवाहन करीत आहे.

याबाबत त्याला विचारले असता, डाॅ.जितेंद्र जितेंद्र आव्हाड हे माझ्यासाठी आदर्श आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक समतेसाठी करीत असलेले काम आदर्शवत आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन असा कोणताही भेदभाव न करता ते समाजातील समानतेसाठी झगडत आहेत. कळवा, मुंब्रा भागात त्यांनी विकासकामे करताना कधीच भेदभाव केलेला नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला दिलेले संविधान जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याविरोधात सर्वात आधी जितेंद्र आव्हाड हेच रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या संघर्षामुळेच शोषित समाजाला मूळप्रवाहात राहणे शक्य होत आहे. म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करतो, असे जाॅन जोसेफ याने सांगितले.

अंबरनाथ ते ठाणे प्रवासाबद्दल विचारले असता, रोज सकाळी रेल्वेने दिव्यांगांच्या डब्यात बसून आपण मुंब्रा येथे उतरतो आणि नंतर मुंब्रा शहरात आपण फिरतो, असे जोसेफने सांगितले. तर, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची भेट झाली का, या प्रश्नावर तो म्हणाला, आव्हाड हे आपले आदर्श आहेत. त्यांची आपली प्रचारादरम्यान एकदा भेट झाली आहे. पण, मला जे काम करायचे आहे. ते करणारच आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा जीवंत ठेवणाऱ्या डाॅ. आव्हाड यांना एक लाखाचे मताधिक्य मिळावे, अशी आपली इच्छा आहे. त्यामुळेच त्यांची भेट होवो अथवा न होवो; आपण आपले काम करीत राहणार, असेही जोसेफ याने सांगितले.