इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे लक्ष उपांत्य फेरीत जागा पक्की करण्याकडे

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीतील नववा सामना सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. हेदर नाइटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने शारजाह येथेच बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला, तर लॉरा वूल्फार्टच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०१६ टी-२० विश्वचषक चॅम्पियन वेस्ट इंडिजचा दुबईत १० विकेट्सने पराभव केला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत होणार हा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित करेल.

 

आमने-सामने

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध २४ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी इंग्लंडने १९ आणि दक्षिण आफ्रिकेने चार जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात इंग्लंड ३-२ अशा फरकाने आघाडीवर आहे.

 

संघ

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅटली सिव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, सोफी एकलस्टन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माइया बुशेर, लिनसे स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, बेस हीथ

दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान काप, अयाबोंगा खाका, सुने लिस, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, सेशनी नायडू, क्लोई ट्रायॉन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

डॅनी वायट-हॉज: इंग्लंडच्या या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने बांगलादेशविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात ४० चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. तिच्या खेळीत पाच चौकारांचा समावेश होता. त्या उत्कृष्ट खेळीसाठी तिने सामनावीराचा पुरस्कारही जिंकला.

लिन्से स्मिथ: इंग्लंडच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने बांगलादेशविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात दोन बळी घेतले होते. तिने पॉवरप्लेमध्ये दोन षटके टाकली ज्यात तिने एक विकेट पटकावली. याशिवाय, निर्धाव (मेडन) षटक टाकणारी ती या सामन्यातील एकमेव गोलंदाज होती.

लॉरा वूल्फार्ट: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले. धावांचा पाठलाग करताना तिने तिची सलामीची जोडीदार तझमिन ब्रिट्ससोबत ११९ धावांची भागीदारी करत संघाला एक शानदार विजय मिळवून दिला.

नॉनकुलुलेको मलाबा: दक्षिण आफ्रिकेच्या या डाव्या हाताच्या फिरकीपटूने मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध तिच्या आंतराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम आकडेवारी नोंदवली. तिने चार षटकात २९ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. तिने डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि तिच्या संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा विकेट्स काढून दिल्या.

 

हवामान

सुमारे ३१ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता ४८% असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ७ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार