जिल्ह्यात दुबार मतदार घटण्याऐवजी वाढविले

उच्च न्यायालयात दाद मागणार-राजन विचारे

ठाणे : ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटण्याऐवजी वाढवल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली तसेच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत १ लाख ६६ हजार ९१० दुबार नावांची प्रिंट कॉपी व सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिले असतानाही ही नावे वगळली नाहीत, उलट वाढवली आहेत. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्वेनुसार एक लाख ९३,३०२ दुबार नावे आढळून आलेली आहेत. म्हणजे एकूण २६,३९२ नावे वाढली आहेत. याबाबत प्रचंड नाराजी दर्शवून श्री.विचारे यांनी निवेदनातून प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.

ही नावे वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागणार असल्याचा असा इशारा विचारे यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, संजय दळवी, प्रतिक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वी

१४५ मीरा-भाईंदर विधानसभा:३४३१०
१४६ ओवळा-माजिवडा विधानसभा: २९०८२
१४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा: २१३२०
१४८ ठाणे विधानसभा: १६७६०
१५० ऐरोली विधानसभा: ३९५९०
१५१ बेलापूर विधानसभा: २५८४८

नंतर
१४५ मीरा-भाईंदर विधानसभा: ४६८९०
१४६ ओवळा-माजिवडा विधानसभा: ४५७६६
१४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा: १७९९७
१४८ ठाणे विधानसभा: १३८११
१५० ऐरोली विधानसभा: ३९७६०
१५१ बेलापूर विधानसभा: २९०७८