ठामपाचे फिरणार वाहन; घराशेजारीच श्री विसर्जन

* गणपतीच्या सुरळीत आगमनासाठी खड्डे दुरुस्ती सुरू
* विसर्जन व्यवस्थेची जय्यत तयारी

ठाणे : ठाणे महापालिकेत चार प्रभाग समित्यांच्या हद्दीत विसर्जन व्यवस्था असलेली सहा वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांना त्यांच्या घराशेजारीच श्री मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन करता येणार आहे. तसेच गणपतीचे आगमन सुरळीत व्हावे म्हणून रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्यात विसर्जनाची व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन विधीपूर्वक करता येणार आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात नऊ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे.

८ सप्टेंबर (दीड दिवस), १२ सप्टेंबर (सहा दिवस) आणि १३ सप्टेंबर (सात दिवस), १३ सप्टेंबर (११वा दिवस) अशा चार दिवशी ही फिरती विसर्जन व्यवस्था नोपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

महापालिकेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवस्थेत महापालिका क्षेत्रातील एकूण २१४ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १८४ मंडपांच्या परवानगी देण्यात आल्या आहेत. उर्वरित मंडप परवानगीची प्रक्रिया सुरू असून त्या लवकरच दिल्या जातील, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली.

आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स-टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे.

जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत. त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा नऊ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.