ठामपातील ४०० कंत्राटी कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करु कंत्राटी कामगारांचा इशारा

ठाणे: ठाण्यातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ठाणे महापालिका आयुक्त यांची वारंवार भेट घेऊन देखील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याच पार्श्वभुमीवर कंत्राटी कामगारांनी २१ दिवसांच्या आत मागण्या मान्य करा नाहीतर उपोषण करु, असा इशारा कंत्राटी कामगारांनी दिल्या आहेत.

पालिकेतील ठेकेदारांच्या लुटमारीचा फटका कंत्राटी कामगारांना बसत आहे. किमान वेतन मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर घर कसं चालवणार, मुलांना चांगले शिक्षण कसे देणार हा कामगारांना पडलेला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कामगार त्रस्त असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना एकजूट संघटनेच्या वतीने सतत पाठपुरावा करुन एकनाथ शिंदे यांना अनेकवेळा पत्रव्यवहार करुन देखील पगारवाढ व मेडिक्लेम इन्शुरन्स कोविड भत्ता व इतर कामगारांच्या अनेक समस्यांबाबत अनेकवेळा त्यांना निवेदन देण्यात आले आहे. अनेकदा आंदोलने करण्यात आली, कामगारांनी टक्कल आंदोलनही केले. त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगार वर्गापुढे उपोषणाचा मार्ग राहिला असल्याचे कामगारांनी सांगितले.