जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक जि. प. ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता. छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे. सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व प्रकल्प संचलक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सन २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले गेले. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे.

कुपोषणमुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अति तीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचे काम वर्धा जिल्ह्यात केले आहे.‌ वर्धा जिल्हा राज्यात पहिला पीएम विश्वकर्मा राबविण्यात रोहन घुगे यांनी विषेश प्रयत्न केले आहेत. कुपोषण, शिक्षण, कृषि, पशु, आरोग्य अशा विविध विषयावर अभ्यासपुर्वक कामकाज त्यांनी केले असून विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे कामकाज वर्धा जिल्ह्यात केले आहे.