पदवीधर मतदारांना आमदार संजय केळकर यांचे आवाहन
ठाणे : ज्याप्रमाणे मोदी सरकारची हॅट-ट्रिक झाली त्याचप्रमाणे आमदार निरंजन डावखरे यांना सलग तिसऱ्यांदा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी पदवीधर मतदारांना केले.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली असून गेल्या १२ वर्षांतील विकास कामे पदवीधरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदवीधरांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रचारात श्री.डावखरे यांनी आघाडी घेतली असून मेळाव्यांना पदवीधरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ठाण्यातील चंदनवाडी परिसरात ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, किशोर गुणिजन यांच्या पुढाकाराने पदवीधरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे आणि संदीप लेले यांनी संबोधित केले.
यावेळी बोलताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर म्हणाले, पदवीधरांनी भाजपाला नेहमीच साथ दिली. पुढील काळात शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्रात प्रभावी योजना, प्रभावी धोरणे राबविली जाणार आहेत. त्या योजना आणि धोरणे पदवीधरांपर्यंत पोहोचविण्यासाठी निरंजन डावखरे यांच्यासारखे प्रतिनिधी निवडून पाठवा. ज्याप्रमाणे मोदी सरकारने हॅट-ट्रिक केली, तसे श्री.डावखरे यांना सलग तिसऱ्यांदा कोकण पदवीधर निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. यावेळी भाजपचे शर उपाध्यक्ष महेश कदम, सचिन केदारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सभा संपल्यावर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच नागरिकांना लाडूवाटप करण्यात आले.