मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
ठाणे : जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
16 मार्च 2024 रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूकीची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे या काम पाहत आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदानवाढीवर होण्यास मदत होणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 2456 मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर एकूण 4906 बॅलेट युनिट, 2453 कंट्रोल युनिट व 2453 व्हीहीपॅट लागणार आहेत. मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशिनची सरमिसळही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष झाली असून मतदान केंद्रावरील सर्व मशिन्स सीलबंद करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2453 मतदार केंद्र असून या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलीस कर्मचारी असे कर्मचाऱ्यांचे पथक मतदानाच्या दिवशी कार्यरत असणार आहे. मतदान केंद्रावर करावयाची कामे याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मतदारांना मतदान सहजतेने करता यावे, यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेवून मतदान केंद्रावर पाण्याची सुविधा, लिंबू पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने तयारी सुरू केली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.शिनगारे यांनी नमूद केले.