गावदेवी मैदानात मंडपवाल्यांचे सामान, भंगार गाडी आणि होर्डिंग्ज!

कळव्यातील मुलांनी खेळायचे कुठे?

ठाणे: उन्हाळ्यात शाळांना सुट्टया लागल्या की मुले मैदानाकडे धाव घेतात. कळव्यातील गावदेवी मैदानात जुन्या भंगार सामानासह बेवारस वाहने, मंडप डेकोरटर्सवाल्यांनी कब्जा केल्याने हे मैदान आता हे भंगाराचे गोडाऊन बनले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कळवा विभागातील गावदेवी मैदानाच्या आजूबाजूला बॅनर्स, पोस्टर, मंडपवाल्यांचे बांबू, बंद पडलेली दुचाकी, पार्किंग केलेल्या गाड्या असे दृष्य पाहिल्यानंतर हे खेळाचे मैदान आहे की भंगाराचे गोदाम असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी मैदाने शिल्लक राहिली नाहीत. जी मैदाने आहेत त्यावर विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व लग्न समारंभाच्या निमित्ताने खासगी संस्थाचालकांनी कब्जा केलेला दिसत आहे. कळवा परिसरात मार्केटलगत असलेल्या गावदेवी मैदानात जुनी बेवारस वाहने, मंडप डेकोरेटर्सचे सामान आणि भंगार साहित्य ठेवले जाते. महापालिकेकडून अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम केल्यानंतर मैदानामध्ये साफसफाई सुद्धा होत नाही त्यामुळे कार्यक्रम करणार्‍या संस्थेला दंड आकारणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये मुलांना खेळण्यासाठी ही मैदाने मोकळी करून देण्याची मागणीही कळवेकरांकडून केली जात आहे.