शहापूर : अवघ्या मुंबईची तहान भागविणारा शहापूर तालुक्यात आजही पाण्याची समस्या सुटली नाही. श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या पाणी आंदोलनानंतर शहापुरातील पाणीबाणी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या पाणी आंदोलनात शहापूर तालुक्यात देखील जलजीवन मिशनचा कसा बोजवारा उडाला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांची शहापूर तालुक्यातील गंगामाई देवस्थान आणि तालुक्यातील टहारपुर येथे या ठिकाणी झालेल्या बैठकीत शेकडो महिलांनी उपस्थित नोंदवली होती.
यावेळी विवेक पंडित यांनी एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा हे आवाहन करत आपल्या हक्काच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेण्यासाठी सज्ज व्हा असे सांगितल्यानंतर महिला पाणी आंदोलनासाठी लढण्यास सज्ज झाल्याचे दिसले. प्रत्येक जल जीवन योजनेच्या कामाची पाहणी आणि पंचनामा करून पाईप तीन फुटांपेक्षा कमी खोल पुरला असेल तर पाईप लाईन काढून टाका असे यावेळी पंडित यांनी सांगितले. आसनगावपासून तरुणांनी बाईक रॅली काढून पंडित यांचे शहापूर नगरीत स्वागत केले.
शहापूर तालुक्यात जल जीवन मिशनच्या १८९ योजना मंजूर आहेत. यापैकी १०३ योजना या भावली पाणी योजनेशी सलग्न आहेत. आज पर्यंत एकही योजनेतून प्रत्यक्ष नळाला पाणी देण्याचे काम पूर्ण झाले नाही. मागील काही दिवसांपासून श्रमजीवी संघटना पाणी प्रश्नावर आक्रमक झालेली पाहायला मिळते. याच पाणी प्रश्नावर आंदोलनं सुरू आहेत. आज विवेक पंडित यांनी शहापूर येथील सभेत याच प्रश्नावर लोकांची जनजागृती केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसाठी पाण्याची इतकी सुदंर योजना लोकांना दिली मात्र ती योजना लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहचविण्यात व्यवस्था अपयशी ठरली आहे. पाण्याच्या योजनेसाठी गावोगावी आलेल्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा होत आहे.
तालुक्यात १८९ योजनेंपैकी पैकी ८८ ठिकाणी ठेकेदार काम करत नाही.असे अधिकारी सांगतात. यातील १२ ठेकेदार काम करण्यात रस दाखवत नाही तर चार योजना वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी प्रलाबिंत असल्याचे सांगितले जात असल्याचे पंडित यांनी सांगितले. या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड तर करावेच पण यापुढे त्यांना कोणतेही शासकीय कंत्राट मिळणार नाही अशा पद्धतीची कारवाई करा अशी मागणी यावेळी विवेक पंडित यांनी केली.
भावली योजना ही नाशिक जिल्हयातील इगतपुरी तालुक्यातून पाणी आणून शहापुरकरांची तहान भागवण्याचे शासनाचे नियोजन आहे. मात्र हे काम करत असताना महामार्गालगत होणाऱ्या खोडकामाच्या बदल्यात नाशिक जिल्हा परिषद इथल्या पाणी पुरवठा विभागाकडे पाच कोटी रुपयांची मागणी करत आहेत. हे खूप धक्कादायक आहे. केवळ अशा प्रकारचे अधिकचे पैसे न देण्याच्या कारणावरून योजना रखडवली जात असेल तर धक्कादायक असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे असे पंडित यांनी सांगितले. शहापूरच्या पाण्यावर विसंबून असणारी मुंबई महापालिका येथील जलजीवन पाण्याच्या लाईनचे खोदकाम आपल्या जागेत होणार असल्याने ५६ लाख रुपयाची मागणी करते. याबाबत विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. ठाणे जिल्ह्याचे पाणी वापरणारी महापालिका ठाण्याच्या जिल्हा परिषदेला देणे असलेला थकीत सेस देण्यात कसूर करणारी महापालिका ५६ लाख रुपयांसाठी जर अशा प्रकारे जर अडवणूक करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे यावेळी विवेक पंडित यांनी सांगितले.
या सभेसाठी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, प्रवक्ते प्रमोद पवार,जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, कातकरी घटक प्रमुख मालू हुमणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हस्कर इत्यादी उपस्थित होते.