आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरीमध्ये पोलिसांचा ‘रूटमार्च’

ठाणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली आहे. मात्र, नागरिकांनी निर्भयपणे राहण्याच्या दृष्टीने कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ‘रूट मार्च’चे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार शहरात ‘रुट मार्च’चे आयोजन केले जात आहे. कोपरीतील पहिला रूटमार्च कोपरी पोलीस ठाणे येथून सकाळी १०.०५ वाजता सुरू झाला. त्याचा मार्ग कोपरी गाव कमान-मुख्य वनसंरक्षक कार्यालय चौक-आनंदनगर बोगदा – कमल मेडिकल-कल्याण केंद्र-राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय – गांधीनगर-हनुमान मंदिर-शिवसेना शाखा परत त्याच मार्गे कोपरी पोलीस ठाणे असा होता. यावेळी पोलीस अधिकारी आणि १६ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

याशिवाय, सीआयएसएफचे अधिकारी, २४ अंमलदार आणि एसआरपीएफच्या १६ अंमलदार यांनीही रूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता, असे कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे म्हणाले.