ठामपा ठरली देशातील पहिली महापालिका
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या बसमधील डावीकडील सर्व आसने महिलांकरिता राखीव ठेवण्याबरोबर त्यांना तिकिटामध्ये ५०टक्के सवलत देणारी ठाणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काल अर्थसंकल्प जाहीर केला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. परिवहन सेवेच्या अबोली या बस महिलांकरिता राखीव आहेत. त्याच्या फेऱ्या देखिल होतात, परंतु सामान्य बसमध्ये देखिल महिलांना काही आसने राखीव आहेत. तरी देखिल गर्दीच्या वेळी महिलांना बसमधून उभ्याने प्रवास करावा लागतो. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने बसमधील डावीकडील (दरवाजा) बाजूच्या सर्व सीट महिलांना राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महिलांना तिकीट दरात ५०टक्के सवलत दिली आहे. या पूर्वी महिलांना ३३टक्के आसने आरक्षित होती, तिकीटाचे दर मात्र १००टक्के आकारण्यात येत होते. यापुढे परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना ५०टक्के जागा आरक्षित असतील आणि तिकीट दर देखिल निम्मा असणार आहे.
महापालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. महिला बचत गट तसेच वैयक्तिक व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या महिलांच्या कर्जाचे व्याज महापालिका भरणार आहे. ठाणे पोलिसांच्या मदतीने महिला सुरक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याचा फायदा महिलांना होणार आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.