अंबरनाथला महाशिवरात्रीनिमित्त यंत्रणा सज्ज; काही मार्गांत बदल

अंबरनाथ : उद्या होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्ताने पुन्हा अंबरनाथ नगरी आणि शिवमंदिर परिसर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

मागील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमुळे अंबरनाथला विविध ठिकाणच्या हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्या पाठोपाठ उद्या शुक्रवारी येणाऱ्या महाशिवरात्रीमुळे दर्शनासाठी आणि यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, तात्पुरत्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीच्या मार्गात बदल उद्या शुक्रवारी यात्रेसाठी अंबरनाथ शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. शहरात येणारी हलकी वाहने वैभव हॉटेलकडून एमआयडीसी रोडमार्गे शिवाजी चौक, हुतात्मा चौक आणि मटका चौकाकडे जातील. तर अवजड वाहनांना दिवसभर अंबरनाथ शहरात प्रवेश बंद करण्यात आला असून या वाहनांना वैभव हॉटेलमार्गे टी जंक्शन, फॉरेस्ट नाका यामार्गे अंबरनाथ शहरात प्रवेश करता येणार आहे.

यात्रेला होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी शहरातील शिवमंदिर रोड, लोकनगरी बायपास रस्ता बंद असेल. तर स्वामी समर्थ चौक, कैलासनगर हिंदू स्मशानभूमी, कुर्ला कॅम्प, हिललाईन, परांजपे चाळ या भागात वाहनांसाठी रस्ते बंद केले दिवसभर बंद जाणार असून फक्त पायी चालत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हे रस्ते सुरू असतील, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यात्रा शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने एक पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, ११ पोलीस निरीक्षक, ३८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुमारे ३०० पोलीस कर्मचारी, महिला पोलीस आणि गृहरक्षक दल, त्याशिवाय राज्य राखीव पोलीस बल, साध्या वेशातील पोलीस यांचाही समावेश, छेडछाडी विरोधी पथकाची नजर राहणार आहे. यात्रेकरूंनी त्यांचे मोबाईल आणि किंमती वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.