कासारवडवलीवासींना मिळणार नवीन अद्ययावत मार्केट

ठाणे: ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासारवडवली येथील नागरिकांच्या सोयीसाठी ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जुने मार्केट असून सध्या ते धोकादायक झालेले आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सदरचे मार्केट तोडून त्या ठिकाणी नविन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता श्री. सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी तीन कोटी रूपयांची तरतुद केली. आज या मार्केटचा भुमिपूजन सोहळा ७ मार्च, २०२४ रोजी पार पडल्यामुळे या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

कासारवडवली येथील हे जुने मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसेच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण-मच्छी तसेच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. आता तर या परिसरामध्ये उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुध्दा या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचे काम होणार असून तळ अधिक एक मजल्याचे हे मार्केट असून एका वर्षामध्ये बांधून पूर्ण होऊ शकेल. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झालेली असून नविन मार्केटचे आज भुमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरूवात होत असल्याने ग्रामस्थांनी श्री. सरनाईक यांचे आभार मानले.

याप्रसंगी नगरसेवक सिध्दार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, विभागप्रमुख दिलिप ओवळेकर, रवी घरत आदी पदाधिकारी उपस्थित होते.