तीन दिवसांत साडेसतरा लाखांचा नफा
ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेमार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात स्टॉल धारकांना तीन दिवसांत १७ लाख ५३,१३५ रुपयांचा नफा झाला. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महिला बचत गटांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
१ ते ३ मार्च २०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन दिवसांत सहभागी महिला बचत गटांना तब्बल १७ लाख ५३,१३५ रुपये नफा झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या स्वयं साहाय्यता गटांना मोबदला चांगला मिळाला आहे. आमच्या फुड स्टॉलवर नागरिकांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे आणि आमचा तीन दिवसांतील नफा ५० हजार रुपये झाला आहे, असे श्रावणी महिला स्वयं साहाय्यता गट, अंबरनाथच्या सुजाता जाधव यांनी सांगितले.
प्रदर्शनामध्ये मिनी सरस ५० स्टॉल, जिल्हा सरस २५ स्टॉल होते. खाद्य पदार्थ, मसाले, हळद, इंद्रायणी तांदूळ, ग्रामीण कलाकसुरीच्या विविध वस्तू, नागलीच्या कुकीज, नागली प्रिमिक्स, कडधान्य, डाळी, शाकाहारी, मांसाहारी मेजवानी व इतर विविध वस्तु विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी उपलब्ध होते.