आचारसहिंतेच्या धास्तीने भूमिपूजन आणि लोकार्पणाची सुरू लगीनघाई

तातडीच्या कार्यादेशासाठी आ. सरनाईकांनी घेतली आयुक्तांची भेट

ठाणे: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने शहरातील आणि विशेष करून आपापल्या मतदार संघातील विकासकामांचे भूमिपूजन करण्याची गडबड सर्वत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांच्या मतदार संघातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. तर तातडीने कार्यादेश देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांचीही भेट घेतली आहे.

ओवळे-माजिवडे मतदार संघातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे वरचेवर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत असतात. राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मतदार संघात राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आणण्यात आमदार सरनाईक हे यशस्वी ठरले आहेत. राज्य शासन आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सरनाईक यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून या सर्व कामांचे भूमिपूजन आणि ज्या कामांना ठाणे महापालिकेकडून कार्यादेश देण्यात आले नसतील अशा कामांचे तातडीने कार्यादेश काढण्यासाठी सरनाईक यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.

ज्या कामांचे भूमिपूजन करायचे आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आपल्याला नक्की वेळ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका आर्थिक डबघाईला आली असल्याच्या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेची आर्थिक परिस्थती चांगली असून यासंदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर शुध्दीपत्रक काढणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

निधी देण्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक हा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी कधीच केला नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. निधीबाबत हे सरकार कधीची कमी पडले नाही. जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात भरघोस निधी मिळाला असल्याचे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ निर्णय घेतील. ठाण्याची जागा शिवसेना की भारतीय जनता पक्षाला मिळणार, हे अद्याप निश्चित झाले नाही. परंतु शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी अजूनही या जागेसाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले. 22 जागांपैकी ठाणे लोकसभा या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आणि बंधनकारक असेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

या कामांचे होणार भूमिपूजन
नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करणे, पोखरण रोड नं. २ येथील लक्ष्मी-नारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भुखंडावर मराठा भवन उभारणे, लिटील फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपन भिंत व लेव्हलिंग करून सुशोभिकरण करणे, शिवाईनगर येथील कै. सुधाकर वामन चव्हाण इमारतीचे भुमिपूजन करणे, वसंतविहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग, बँक्वेट हॉल, तसेच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचे भुमिपूजन करणे, लोकमान्यनगर येथील सिध्दिविनायक पुर्नवसाहत, समतानगर येथील मिलिंद हौसिंग सोसायटी, आनंदराम नगर व राजीव गांधीनगर या वसाहतींचा विकास करणे, तसेच एमएमआरडीएतर्फे करण्यात येणाऱ्या घोडबंदर रोडच्या सेवा रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे