लुईसवाडी, कोपरी, नौपाड्यात ५० टक्के पाणीकपात

ठाणे : ठाण्यातील काही भागात सोमवार पासून ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पिसे येथील उदंचन केंद्र बंद पडल्यामुळे ही कपात करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

ज्या पद्धतीने पाण्याचा दाब असेल त्या पद्धतीने प्रभाग समितीनिहाय झोनिंग पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहनही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होऊन संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. परिणामी मुंबई महापालिकेने पाणी पुरवठयामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणीही सोमवारपासून 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. याचा फटका ठाण्यातील काही भागांना बसला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील लुईसवाडी विभागात हाजुरी, लुईसवाडी, साईनाथ नगर, काजुवाडी, रामचंद्र नं 1, रघुनाथ नगर, अंबिका नगर, कोपरी विभागात कोपरी, धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ परिसर, आनंदनगर, नौपाडा विभागात गावदेवी जलकुंभ, टेकडी बंगला परिसर या ठिकाणी 50 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

ठाण्यातील ज्या भागात ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.