सायन्स पार्क सहा महिन्यांत होणार सज्ज

तांत्रिक कामामुळे लोकार्पण मात्र २०२५ मध्ये होणार

नवी मुंबई : शैक्षणिकदृष्ट्या शालेय विद्यार्थ्याच्या ज्ञानात लक्षणीय भर पडावी तसेच नागरिकांना विज्ञानाची हसत-खेळत ओळख होण्याच्या दृष्टीने नेरूळ सेक्टर- १९ अ येथे अद्ययावत व अत्याधुनिक स्वरुपातील ‘सायन्स पार्कची निर्मिती नोव्हेंबरपर्यंत होणार असली तरी ते खुले मात्र दोन वर्ष उशिराने होणार आहे.

शास्त्र व तंत्रज्ञान हे मनुष्याच्या भावी जीवनाला कशा प्रकारे प्रभावित करेल व त्याचा मानवी जीवनावर भविष्यात काय परिणाम होईल यावर प्रकाशझोत टाकणारा वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, विज्ञान व तंत्रज्ञान विषयक संकल्पनांचे चित्रे, मॉडेल्स, माहितीपट, प्रात्यक्षिक स्वरुपात वैविध्यपूर्ण सादरीकरण या सायन्स पार्क द्वारे विद्यार्थ्या बरोबरच नागरिकांना मिळणार आहे. सायन्स पार्क हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी पालिका अभियांत्रिकी विभाग कामाला लागले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे दोन वर्ष उशिराने सायन्स पार्क सुरु होणार आहे.

जीवन जैवसृष्टीचा भाग म्हणून मनुष्याचा विकास, आरोग्य व पोषण, मानवाची प्रगती या सायन्स पार्कमध्ये मांडण्यात येणार आहे. ऊर्जा व विविध उपलब्ध ऊर्जास्त्रोत, भविष्यातील ऊर्जास्त्रोतांचा शोध, जैवसृष्टीसाठी ऊर्जेचे उद्देश व उपयोग या वर प्रकाश टाकण्यात येणार आहे. पर्यावरण, सजीवसृष्टी व वातावरण, जैवविविधता व अनुकूलता, निसर्गचक्राचे परिणाम, जागतिक तापमान वाढ व त्याचे वातावरणावरील परिणाम, वापरात असलेले निसर्गस्त्रोत, पर्यावरणाशी बांधिलकी व प्रतिसाद हे विषद करण्यात येणार आहे. अंतराळ-बिग बैंग सिद्धांत निर्मिती व इतिहास, पृथ्वीचे अस्तित्व व जैवसृष्टी, तारे, ग्रह, अवकाश या संबंधी माहिती मिळणार आहे. यंत्र व रोबोट मशीन्सचे प्रकार, मशीन्सची कार्ये व उत्पादन, मशीन्सची कार्यक्षमता व कामांवर होणारा परिणाम, स्मार्ट मशीन्स आदींची देखील माहिती प्राप्त होणार आहे.

एन्ट्स फ्लायओव्हर, विज्ञान प्रयोग, प्रदर्शन विभाग, सोव्हिनियर शॉप, कॅफेटेरिया स्टोअर्स प्रशासकीय कार्यालय, बहुउद्देशीय हॉल, सभागृह, प्रसाधन गृह व वाहनतळ आदींचा समावेश सायन्स पार्कमध्ये असणार आहे.

सायन्स पार्कच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ २०००००चौ. मी.असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ १९,९८००० चौ. मी.असणार आहे.

सायन्स पार्कच्या तीन मजली इमारतीचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत कामांना वेळ लागणार असल्याने २०२५ च्या सरत्या वर्षात काम पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.