एक लाख 7,520 विद्यार्थी देणार परीक्षा
ठाणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज म्हणजेच 22 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात 198 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख 7520 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षे शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती. त्यानुसार, मागील वर्षी १७३ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, एक लाख ४,५६१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्याने शाळा-महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेतली जात आहे. आज, बुधवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे. यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्याही वाढली आहे. त्यानुसार यंदा १९८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून एक लाख ७ हजार ५२० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी महाविद्यालय परिसरात सुरक्षेसह कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात राहावे, यासाठी सूचना केल्या आहेत.
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पाडाव्यात, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देण्यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथक नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार अधिकारी असणार असून, यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले यांनी दिली.