डॉ. संतोष कदम झाले आयएमएचे राज्य अध्यक्ष

ठाणे : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीत ठाण्यातील सेवाव्रती डॉक्टर लाइफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष कदम हे भरघोस मतांनी राज्य अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या विजयामुळे ठाण्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेली १४ वर्षे वैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी शहरासह ग्रामीण आणि आदिवासी भागातील सेवाभावी वृत्तीने आरोग्य सेवा पुरवल्याने ते सेवाव्रती डॉक्टर म्हणून अधिक परिचित आहेत.

कोविड टास्क फोर्समध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले असून ठाणे महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी कोविड काळात सहकार्य केले आहे. कोविड रूग्णालय आणि रुग्ण सेवा यात त्यांचा महत्वपूर्ण पुढाकार राहिला आहे. त्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान पाहून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासारखा समाजभान असणारा डॉक्टर आयएमएच्या राज्य अध्यक्षपदी विराजमान झाल्याने ठाणे शहराची मान उंचावली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन ही संघटना जगातील सर्वात मोठी संघटना असून देशात या संघटनेचे चार लाख तर महाराष्ट्रात ५० हजारहून अधिक सदस्य आहेत. राज्य अध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात डॉ.संतोष कदम यांच्यासह तिघे जण होते. मात्र डॉ.कदम यांना पहिल्या क्रमांकाची भरघोस मते मिळाल्याने ते विजयी ठरले.