ठाणे : राबोडी येथील साकेत टॉवरसमोर तरुणाला अज्ञात व्यक्तींनी जलवाहिनीवरून खाडीत फेकल्याचा प्रकार बुधवारी उशिरा राञी घडला.
घटनास्थळी असणाऱ्या तक्रारदाराने कळवा पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांकडून शोधकार्य करण्यात आले. मात्र अद्याप या तरुणाचा थांगपत्ता लागलेला नाही.
साकेत टॉवर समोर असलेल्या पाईपलाईनवर हा प्रकार घडला. रात्री एक तासांच्या प्रयत्नानंतर अंधार असल्याने खाडीमध्ये शोधकार्य करणे शक्य नसल्याने पाण्यात बुडालेल्या मुलाचे शोधकार्य पोलिसांच्या सूचनेनुसार तात्पुरते थांबविण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासून पुन्हा या खाडीपात्रात शोधकार्य सुरु करण्यात आले. सकाळी साडेसातपासून पुन्हा बोटीच्या सहाय्याने खाडीमध्ये तब्बल चार तास शोधकार्य करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा बुडालेल्या मुलाचा शोध न लागल्याने ही मोहीम थांबवली.