ठाणे : संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलने जीवघेणा प्रवास करणे तीन प्रवाशांच्या जीवावर बेतले असून मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान एकाच दिवशी तीन जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. प्रभाकरन पुजारी, रवी पांडे आणि जयेश पाटील अशी लोकलमधून पडून मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत.
याबाबतचे ठाणे रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी मुलुंड येथील विजयानगर मुरुगण गल्ली येथे राहणारे प्रभाकरन पुजारी (२६) आणि उल्हासनगर येथे राहणारा रवी पांडे (२०) हे दोघे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या (स्लो अप् व डाऊन) गाडीतून ठाणे स्टेशन ते मुलुंड स्टेशन दरम्यान असलेल्या कोपरी पुलाखाली खाली पडले. तसेच डोंबिवलीत राहणारा जयेश पाटील (२७) हा तरुण जखमी झाला.
याबाबतची माहिती स्टेशन मास्तरला मिळताच त्यांनी रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या तिघांनाही ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पांडे आणि पुजारी या दोन प्रवाशांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे आणि पाटील याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
या दोन्ही घटना कोपरी पुलाच्या खाली खाली घडल्याने स्थानिक तरुण आणि नागरिकांनी पोलिसांना मदत करून या तिघांनाही रुग्ण वाहिकेतून पुढील उपचाराकरिता पाठवले