पुण्याच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात बससेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कल्याण : पुण्यातील पीएमपीएलच्या धर्तीवर ठाणे जिल्हयातील शहरांत बससेवा सुरू करणार असून रस्ते कनेक्टिव्हिटी केली तर शहरांचा विकास जलद होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये आज केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज कल्याणमधील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून विकास कामांची गंगा आली आहे. कल्याणची भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या ठिकाणी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल तयार करण्याच्या आयुक्तांना सूचना केल्या. कल्याणमध्ये संस्कृती जपण्याचे काम होत असून भव्य अशा सिटीपार्कचे लोकार्पण झाले. सिटीपार्कमुळे लहान मुलं, महिला, तरुण, अबाल वृद्ध सर्वच आनंद घेतील. आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा उपयोग होतो. ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात हे सिटी पार्क ऑक्सिजन पार्क म्हणून काम करतात. डीप क्लीनिग मोहीम राबविल्याने शहरे स्वच्छ झाली. नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग वाढत आहे. पब्लिक टॉयलेट दिवसातून चार पाच वेळा स्वच्छ झाले पाहिजेत. महाराष्ट्राला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. स्वच्छतेवर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अर्बन फॉरेस्ट करायला हवे, जेणे करून नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. राज्यात विकासाचे पर्व आले असून याला केंद्राचे पाठबळ मिळत आहे. सर्व शहरांना जोडणारा रिंगरोड केला तर वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागणार नाही. या विकास कामांना लागणार निधी देऊ. रस्ते कनेक्टिव्हिटी केली तर शहरांचा विकास जलद होतो. पुण्याच्या पीएमपीएल धर्तीवर भिवंडी कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर या शहरात मोठी बस सेवा सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील सिटी पार्क, कै. दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ इमारत, यांचे लोकार्पण प्रत्यक्ष स्वरुपात तसेच विविध प्रकल्प पात्र बाधितांना सदनिका वितरण प्रत्यक्ष स्वरुपात आणि इलेक्ट्रीक बसेस, आणि अग्निशमन केंद्र व क प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण, अमृत 2.0 प्रकल्प अंतर्गत गौरीपाडा येथे 95 द.ल.लि. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील नविन जलकुंभ बांधणे इ. चा भूमी पूजन कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ऑनलाईन स्वरुपात झाला.