माजिवडे मानपाडा हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा ठपका

उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस

ठाणे: अनधिकृत बांधकाम करणाऱ्याच्या विरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असतानाच माजिवडे-मानपाडा आणि वर्तकनगर या प्रभागांतील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परिमंडळ दोनच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली उडाली आहे.

घोडबंदर भागातील बाळकूम, कोलशेत, आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पुराव्यासह महापालिका आयुक्त श्री. बांगर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन आयुक्त श्री. बांगर यांनी या परिमंडळाचे उपायुक्त दिनेश तायडे यांना मागील आठवड्यात बंद लिफाफ्यामध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप नागपूर येथिल हिवळी अधिवेशनात करण्यात आला होता. या बांधकामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक फसवणूक होतेच शिवाय य अनधिकृत इमारती आणि चाळींमध्ये घर खरेदी करणाऱ्या गरीब नागरिकांचीही फसवणूक होते. तसेच उपलब्ध सुविधांवर ताण पडून नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब श्री.केळकर यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते तसेच त्या भागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देखिल देण्यात आले होते.

त्यानंतर जानेवारीपासून शहरात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने जोरदार कारवाई सुरु केली होती. आत्तापर्यंत ९६ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत तर दहा जणांच्या विरोधात एमआरटीपी कायाद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.