ठाणे : विविध मागण्यांसाठी ‘आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येताना वाटेत अनेक ‘आशा’ स्वयंसेविकांची तब्येत ढासळली. यापैकी सहा स्वयंसेविकांना चक्कर, रक्तदाब, शुगर आणि श्वास घेण्यासाठी कमालीचा त्रास वाढल्यामुळे भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे सेविकांवर त्वरेने औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. सेविकांनी रुग्णालयाचे आभार मानले आहेत.
ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचा-यांचे गट आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहापूर ते मंत्रालय पदयात्रा मोर्चा ठाण्याकडे येत होता. त्यावेळी भिवंडी परिसरात अनेक ‘आशा’ स्वयंसेविकांना चालताना त्रास झाला. यापैकी १८ आशा स्वयंसेविका उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी सहाजणींची तब्येत थोडी-अधिक बिघडल्यामुळे शुक्रवारी तत्काळ ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या तब्येती पाहून रुग्णालयाने वेळीच योग्य उपचार केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
सिव्हील रुग्णालयात दाखल झालेल्या आशा स्वयंसेविकांना रक्तदाब, चक्कर, शुगरचा त्रास आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. यापैकी दोघी मोर्चात बेशुद्ध झाल्या असल्याचे आशा स्वयंसेविका म्हणाल्या. मात्र सिव्हिल रुग्णालयात सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. सोनोग्राफी, रक्त तपासणीबरोबर उपचारही चांगले केले असल्याची माहिती आशा स्वयंसेविकानी दिली.
‘स्वयंसेविकाच्या मोर्चात वाटेत कोणाला त्रास झाला तर त्यांच्या उपचारासाठी सिव्हील रुग्णालयाचे आरोग्य पथक तैनात होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. आळसपुरकर आणि कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून लवकरच त्यांना घरी सोडले जाईल,अशी माहिती डॉ. कैलास पवार यांनी दिली.